प्रकाशन करीता
बातम्या प्रकाशित करण्यासाठी +91 9422318479 वर संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.

तरुणांच्या कर्तृत्वावर देशाचे भवितव्य; लातूरमध्ये विद्यार्थी विकास योजनेचे भव्य संमेलन

तरुणांच्या कर्तृत्वावर देशाचे भवितव्य
---
अरुण करमरकर
----
लातूर येथे विद्यार्थी विकास योजनेचे संमेलन
----
लातूर : तरुणांच्या कर्तृत्वावर देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे उद्याचा भारत सामर्थ्याने उभा राहाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संचालक अरुण करमरकर यांनी येथे केले. 
           लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात रविवारी (दि.१) सेवा सहयोग फाउंडेशन अंतर्गत विद्यार्थी विकास योजनेतील लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचे संमेलन झाले. त्याप्रसंगी श्री. करमरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सदस्य प्रा. प्रकाश देशमुख हे होते. यावेळी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.श्रीहरी तलवारे, निवृत्त प्राचार्य डाॅ. बी. आर. चव्हाण, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बाबासाहेब ठोंबरे व प्रा. एस. के. गुजर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
         श्री. करमरकर म्हणाले, की सर्व घटकांच्या बळावरच ही विद्यार्थी विकास योजना चालते, पालक हा या उपक्रमाचा कणा आहे. या संस्थेसह विद्यार्थ्यांना धावण्याचे अधिक बळ हा समाज देत असतो. हा वसा पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे काम आपण केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
         राज्यातील गुणवंत, गरजू व परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी विकास योजनेमार्फत आर्थीक मदत केली जाते. अशी मदत झालेले विद्यार्थी व पालकांचे हे वार्षिक संमेलन आयोजित केले होते. यावर्षी लातूर जिल्ह्य़ातील (३५), बीड (७२) व धाराशिव (१०) विद्यार्थ्यांना या योजनेमार्फत आर्थीक मदत केली आहे. या योजनेतील एक हजार ३६४ विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असून ४८६ विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती
विवेक सुर्वे, अजित केतकर यांनी यावेळी दिली.
         यावेळी प्रा. तलवारे, आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार, मनिषा पवार यांचीही भाषणे झाली. काही पालक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एस. के. गुजर यांनी प्रस्तावित केले. प्रा. डाॅ. धनंजय मेनकुदळे, एस. ए. मोरे, रामकृष्ण पवार, श्री. योगेश्वर गुट्टे, सचिन बांगड, प्रा. विलास लूटे, प्रा. गुणवंत बिरादार, प्रो. डाॅ. मल्लिकार्जून करजगी यांचाही सत्कार झाला. सूत्रसंचालन आदर्श शिक्षक शिवलिंग नागापूरे यांनी केले.
          या संमेलनासाठी तीनही जिल्ह्यातील २५० विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना चलचित्राव्दारे विद्यार्थी विकास योजनेतील विद्यार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात आल्या. 
---



तरुणांच्या कर्तृत्वावर देशाचे भवितव्य; लातूरमध्ये विद्यार्थी विकास योजनेचे भव्य संमेलन तरुणांच्या कर्तृत्वावर देशाचे भवितव्य; लातूरमध्ये विद्यार्थी विकास योजनेचे भव्य संमेलन Reviewed by Files on फेब्रुवारी १३, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


जाहिरात
जाहिरातीसाठी +91 9511606451 वर संपर्क साधा.
Blogger द्वारे प्रायोजित.